राज्यात पुन्हा उडणार ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा .......

राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा......

पुणे मुंबईसह,राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विविध ग्रामपंचायती मधील रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. १८ मे २०२३ रोजी मतदान घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राजीनामे, निधन, रद्द झालेले सदस्यत्व किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांसाठी आणि ग्रामपंचायतीमधील एकूण ३ हजार ६६६ सदस्य व १२६ सरपंचांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दिनांक २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. तसेच उमेदवारी अर्जांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. उमेदवाराला आपला अर्ज ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटपही करण्यात येणार आहे.

१८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. १९ मे २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.